१ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत!

By मयुरेश वाटवे | Published: April 15, 2024 05:41 AM2024-04-15T05:41:10+5:302024-04-15T05:42:22+5:30

थिरुअनंतपुरमचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. शशी थरुर हे काँग्रेसच फायरब्रँड नेते

Victory only if more than 1 lakh votes High voltage fight in Thiruvananthapuram | १ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत!

१ लाख अधिक मते मिळाली तरच विजय; थिरुअनंतपुरममध्ये हाय व्होल्टेज लढत!

मयुरेश वाटवे, लोकमत न्यूज नेटवर्क 
थिरुअनंतपुरम
: थिरुअनंतपुरमचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. शशी थरुर हे काँग्रेसच फायरब्रँड नेते. अनेक कारणांसाठी ते सतत चर्चेत असतात. यंदा त्यांच्याविरोधात भाजपने मोदी सरकारमधील कौशल्य विकास आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना उतरवल्याने केरळमधील या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. राजीव चंद्रशेखर राज्यसभा खासदार आहेत. सीपीआयचे पन्नायन रवींद्रन तिसरे उमेदवार आहेत. ते २००५ मध्ये सीपीआयतर्फे खासदार म्हणून निवडून गेले होते. कष्टकरी समाजाचा आवाज म्हणून ते परिचित आहेत. 

गेल्या वेळी थरूर यांच्या विरोधात भाजपचे कुम्मानन राजशेखरन यांनी निवडणूक लढवली होती. लाखभर मतांच्या फरकाने थरूर ही निवडणूक जिंकले होते.  लाखभर मतांचा हा फरक राजीव चंद्रशेखर भरून काढू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपने अनेक राज्यातील मंत्र्यांना, राज्यसभा खासदारांना या वेळी लोकसभा निवडणुकांत उतरवण्याचे ठरवले आहे. राजीव चंद्रशेखर हे त्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात स्मृती इराणी यांनी घडवलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती चंद्रशेखरही  करतात का हे पाहावे लागेल.

केरळ हा सीपीआयचा गड 
असला तरी गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत लोकसभेत थिरुअनंतपुरम जागा त्यांना हुलकावणी देत आहे. यंदा त्यांनी २००५ साली या मतदारसंघातून जिंकलेल्या पन्नायन रवींद्रन यांना मैदानात उतरवले आहे. गेल्यावेळी सी. दिवाकर यांनी सीपीआयतर्फे निवडणूक लढवली होती. ते अडीच लाख मतांसह तिसऱ्या स्थानी गेले होते.

मुद्दे आणि गुद्दे
चंद्रशेखर मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवत असल्याचा थरूर यांचा आरोप
थरूर आपल्याविरुद्ध बदनामीकारक प्रचार करत असल्याचा चंद्रशेखर यांचा दावा
थरूर यांचे दावे आचारसंहितेचा भंग करणारे चंद्रशेखर यांचे मत
आपले आरोप थरूर यांनी मागे घ्यावेत आणि माफी मागावी अशी चंद्रशेखर यांची मागणी आहे.

हे ठरताहेत प्रचाराचे मुद्दे
- राज्यातील बेरोजगारी, गृहनिर्माण अशा प्रमुख समस्या चर्चेचा मुद्दा ठरत आहेत.
- त्याचबरोबर सीएए, मणिपूर हिंसाचार हे राष्ट्रीय मुद्देही तापवण्यात येत आहेत.

२०१९ मध्ये काय घडले? 
शशी थरुर काँग्रेस (विजयी) ४१६१३१ 
कुम्मानन राजशेखरन भाजप ३१६१४२

२०१९ पूर्वी कोणाची बाजी
२००९,२०१४, २०१९ शशी थरुर काँग्रेस
२००५ पन्नायन रवींद्रन सीपीआय (पोटनिवडणूक)
२००४ पी. के. वासुदेवन नायर सीपीआय
१९९९ व्ही. एस. सिवकुमार काँग्रेस

प्यार का ‘नोटा’ तेरा...
२०१९ साली उमेदवारांनी लाखांच्या आकड्यात मते मिळवली असली तरी चौथ्या क्रमांकाने ४५८० मते मिळाली होती.  या क्रमांकावरील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. कारण चौथ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ने मिळवली होती.

Web Title: Victory only if more than 1 lakh votes High voltage fight in Thiruvananthapuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.