योगेश पांडे, वर्धा (छत्तीसगड)आपल्या देशात विदर्भासह विविध लहान राज्यांची मागणी समोर येत आहे. लहान राज्यांमध्ये वेगवान विकासाची क्षमता असते. वेगळ्या विदर्भाबाबत तेथील राजकारणी निर्णय घेतील. विदर्भामध्ये खरोखरच विकासाची प्रचंड क्षमता आहे.परंतु यासाठी केवळ मोठमोठ्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. यासाठी योग्य दृष्टिकोन आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक आहे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांनी व्यक्त केले. छत्तीसगड शासनाच्या लोकसुराज मोहिमेदरम्यान त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.वेगळ्या छत्तीसगड राज्याची निर्मिती व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उचलला होता. विदर्भात साधनसंपत्ती उपलब्धआहे. त्यामुळे वेगळे राज्य म्हणून विकासाची प्रचंड संधी आहे. परंतु यासाठी विधिमंडळातून वेगळ््या राज्याचा प्रस्ताव जायला हवा. राज्यनिर्मितीचा हा पहिला टप्पाच जास्त सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, याकडे डॉ.रमण सिंह यांनी लक्ष वेधले. ‘बस्तर’मधली ती घटना दुर्दैवीनक्षलप्रभावित बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वी ‘जेएनयूमधील प्राध्यापकांनी जाऊन गावकऱ्यांना प्रशासनाविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले. संबंधित प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आदिवासी क्षेत्रातील लोकांना सरकारविरोधात करण्याचे काही बुद्धिजिवी प्रयत्न करत आहेत. परंतु असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. प्रशासन आदिवासींना त्रास देत असल्याचा कांगावा नक्षलसमर्थक करतात. परंतु जर सरकार आदिवासी नागरिकांच्या विरोधात असते तर त्यांनी आम्हालाच सलग तीनवेळा कसे निवडून दिले असते, असा प्रश्न डॉ.सिंह यांनी उपस्थित केला.छत्तीसगडची निर्मिती झाली त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु उपलब्ध साधनसंपत्तीच्या जोरावर आमची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. सहा हजार कोटींपासून सुरू झालेला अर्थसंकल्प आता ७६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले.नक्षलवाद्यांच्या समर्थनात घट, आदिवासींना हवा विकासच्गेल्या काही वर्षांपासून नक्षलप्रभावित बस्तर, सरगुजा, जगदलपूर या भागातील आदिवासी नागरिकांमध्ये जागरूकता येत आहे. त्यांनादेखील रस्ते, वीज, पाणी, रोजगार हा विकास अपेक्षित आहे. नक्षलवाद्यांना गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या समर्थनात घट होत आहे, असा दावा डॉ.रमण सिंह यांनी केला. सरगुजामधील नक्षलवाद्यांचा प्रभाव फारच कमी झाला आहे. बस्तरमध्येदेखील आम्हाला ७० ते ८० टक्के यश मिळाले आहे. प्रशासनाला नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
विदर्भ निर्मिती-विकासासाठी ‘व्हीजन’ हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 3:55 AM