नवी दिल्ली - घोड्यावर बसून मुलगी परीक्षेला जात असल्याचा शाळकरी मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला लाखो लोकांनी पसंती दिली असून हा व्हिडीओ केरळमधील त्रिशूर येथील असल्याचं सांगितले जात आहे. शाळेच्या गणवेशात एक मुलगी घोड्यावर बसून शाळेत परीक्षा देण्यासाठी निघाली असल्याचा हा व्हिडीओ आहे.
फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेक जण या व्हिडीओला लाईक्स करत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हजारो फॉलोअर्सने हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओला पोस्ट करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, शानदार, असे व्हिडीओ व्हायरल व्हायला हवेत, हा एक अतुल्य भारत आहे. त्रिशूरमध्ये कोणी या मुलीला ओळखतं का? असं विचारत मला या मुलीबरोबर आणि तिच्या घोड्यासोबत एक फोटो काढायचा आहे. हीच माझी खरी हिरो आहे. तिच्या शाळेत जाण्याच्या या व्हिडीओने मला भविष्यासाठी आशावादी बनविले आहे असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे.
या व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्यावर वाहतूक कोंडी असताना घोड्यावरुन स्वारी करत असल्याचं दिसून येतं. या मुलीने शाळेचा गणवेश घातलेला आहे तसेच पाठीवर शाळेची बॅगदेखील लटकवली आहे. सफेद घोड्य़ावर स्वार होत ही मुलगी शाळेत चालली आहे.