नवी दिल्ली - भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (ITBP) जवान देशाच्या सीमेवर सुरक्षेसाठी रात्रंदिवस तैनात असतात. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभ्या असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आयटीबीपीचे 55 वर्षीय कमांडेंट रतन सिंह सोनल यांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. त्यांनी मायनस 30 डिग्री सेल्सियस तापमानात 65 पुशअप्स मारले आहेत.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (ITBP) 55 वर्षीय कमांडंट रतन सिंह सोनल यांनी लडाखमध्ये सुमारे 17,500 फूट उंचीवर आणि उणे 30 अंश सेल्सिअस तापमानात 65 पुशअप्स यशस्वीपणे पूर्ण करत अनोखा रेकॉर्ड केला आहे. त्यांचा पुशअप्स मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कमांडंट रतन सिंह सोनल, मूळचे उत्तराखंडच्या कुमाऊ खोऱ्यातील पिथौरागढचे रहिवासी आहेत. ते 1988 च्या बॅचमध्ये आयटीबीपीमध्ये उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यांनी आपल्या सेवेत अनेक रेकॉर्ड केले आहेत.
रतन सिंह सोनलने जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माऊंट मनास्लू जिंकून जगात एक नवा विक्रम केला आहे. आयटीबीपी कमांडंट रतन सिंग सोनल आणि डेप्युटी कमांडंट अनूप कुमार यांनी 25 सप्टेंबर 2021 रोजी या शिखरावर यशस्वी चढाई केली होती. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 8,163 मीटर (26781 फूट) आहे. ही गिर्यारोहण मोहीम सात सप्टेंबर 2012 रोजी सुरू झाली होती.
आयटीबीपीची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी झाली आहे. आयटीबीपीचे जवान प्रामुख्याने लडाखमधील काराकोरम पास ते अरुणाचल प्रदेशातील जाचेपला पर्यंत 3,488 किमी लांबीच्या भारत-चीन सीमेच्या रक्षणासाठी तैनात आहेत. याशिवाय छत्तीसगडमधील अनेक अंतर्गत सुरक्षा कामांमध्ये आणि नक्षलग्रस्त भागातही हे दल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सैन्याच्या बहुतेक सीमा चौक्या 9,000 फूट ते 18,800 फूट उंचीवर आहेत. तिथे तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.