नवी दिल्ली : वाहतुकीच्या नव्या नियमानुसार आता वाहन चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. पण, बऱ्याचदा असे होताना दिसत नाही. लखनऊमधील एका अल्पवयीन मुलाने गाडी चालविल्याचा फटका त्याच्या वडिलांना बसला आहे. या अल्पवयीन मुलाचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्यांच्या वडिलांना तीस हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
लखनऊमधील काकोरी पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शानू असे या आठ वर्षीय मुलाचे नाव आहे. शानू मोठ्या आत्मविश्वासाने गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये गाडी चालवताना शानूचे पाय जमिनीला सुद्धा पोहोचत नाहीत. अशा स्थितीत गाडीवर नियंत्रण आणण्यासाठी पाय जमिनीवर ठेवणे गरजेचे असते. पण, शानूसाठी हे धोकादायक होते. तसेच, सार्वजनिक ठिकाणी असे स्टंट करने धोक्याचे असते. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.
शानूचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा नंबर पाहून गाडीचे मालक म्हणजेच शानूचे वडील यांना ताब्यात घेतले आणि वाहतुकीच्या नव्या नियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. नव्या नियमानुसार, अल्पवयीन मुलांनी गाडी चालविल्यास 25 हजार रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच, पालकांनी मुलांना वाहन चालविण्याची परवानगी दिल्यामुळे 5 हजार अतिरिक्त दंड आकारला जातो. त्यामुळे शानूच्या वडिलांना पोलिसांनी एकूण 30 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.