मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने 25 हून अधिक लोक विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत काही जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातच एक विहीर आहे, ज्यावर छत होते ते कोसळले. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मंदिरात होम-हवन केले जात होते आणि लोक विहिरीवर बसले होते. अचानक वजन वाढल्याने विहिरीचे छत कोसळले. काही समजण्यापूर्वीच लोक खाली पडले. पडलेल्यांमध्ये काही मुलींचाही समावेश आहे. रामनवमीमुळे मंदिरात गर्दीही जास्त होती. स्थानिकांनी तत्परता दाखवत काही जणांना बाहेर काढले ही दिलासादायक बाब आहे.
दहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस कमिश्नर मकरंद देउस्कर यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. एसडीआरएफची टीमही अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे. सर्व भाविकांना मंदिराबाहेर काढण्यात आले आहे. रुग्णवाहिकाही पोहोचली आहे. विहिरीत पडलेल्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.