भिवानी - हरियाणातील भिवानी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे रामलीलाच्या मंचावर हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या हरीश मेहता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रामलीला मंचावर सुरु असताना अचानक हरीश मेहता खाली कोसळले. सुरुवातीला लोकांना हा नाटकाचा भाग आहे असं वाटल्याने प्रत्येकजण राम नामाच्या जयघोषात तल्लीन झाले. मात्र खूप वेळ झाला त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शहरातील जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेतर्फे राम राज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमानाची भूमिका करणार्या हरीश मेहता यांना रामाच्या चरणी नतमस्तक होताना मरण आले. बराच वेळ प्रेक्षकांना वाटले की हनुमान अजूनही पूजा करत आहेत. मात्र मंचावर उपस्थित लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट असून त्यांचे अश्रू थांबत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हरीश हे वीज विभागातून जेई पदावरून निवृत्त झाले होते. गेली २५ वर्षे ते हनुमानाची भूमिका करत होते. मंचावर ते रामजींच्या चरणी नतमस्तक झाले पण पुन्हा उठले नाहीत. त्यांना आंचल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांनी जीव गमवावा लागला होता असं कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले.