ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - क्रिकेटच्या मैदानावर अनेक नवंनवे रेकॉर्ड करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सामाजिक सेवेनं हैदराबादकर आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकदा वाहतूक पोलीस बाईकस्वारांना अपघात टाळण्यासाठी हेल्मेट घालण्याची सूचना करतात. त्यासाठी कायदाही कठोर करण्यात आला आहे. मात्र तरीही अजून काही जण हेल्मेट न घालताच बाईक चालवतात. अशा बाईकस्वारांना दंड ठोठावूनही ते काही मार्गावर येत नाहीत. आता मात्र चक्क क्रिकेटचा देव यासाठी पुढे सरसावला आहे. हैदराबादेत एक तरुण विनाहेल्मेट बाईक चालवत असताना सचिननं गाडी थांबवून त्याला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. साक्षात सचिननं सल्ला देतोय म्हटल्यावर सुरुवातीला त्या तरुणाला विश्वासच बसला नाही. मात्र त्यानंतर त्या तरुणानं बाईक थांबवून सचिनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सचिननं पुन्हा एकदा त्यांना हेल्मेट परिधान करण्यास सांगितलं आणि त्या तरुणांनीही हेल्मेट घालण्यास स्वीकृती दर्शवली. सचिन कारमधून हैदराबादमधील उप्पल रोडवरून जात असताना हा बाका प्रसंग लोकांना पाहायला मिळाला. भररस्त्यात गाडीची काच खाली करून सचिनने त्यांना जवळ बोलवून हेल्मेट घालण्याचे आवाहन केले. आयुष्य हे अनमोल आहे, ते जपा आणि हेल्मेट घालूनच बाईक चालवा, असा सल्ला सचिनने त्या तरुणांना दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सचिनने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. अशा प्रकारचे आवाहन करून सचिनने सामाजिक भान जपलं असून, समाजकार्यातही तो आता सक्रिय असल्याचं अनेकांना दर्शन घडलं.
Helmet Dalo!! Road safety should be the highest priority for everyone. Please don't ride without a helmet. pic.twitter.com/xjgXzjKwQj— sachin tendulkar (@sachin_rt) April 9, 2017