वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्यात सहभाग घेतला. येथील गंगा नदीत स्नान करुन संगम घाटावर मोदींनी विधिवत पूजाही केली. त्यानंतर, गंगा कुंभमेळ्यात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चक्क पाय धुतले. मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूर दौऱ्यावर होते. गोरखपूर येथे शेतकरी सन्मान योजनेतील पहिल्या टप्प्यात मिळणाऱ्या 2 हजार रुपयांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर, त्यांनी प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्याला भेट दिली.
मोदींनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर अक्षयवडाची पूजा करुन तेथील हनुमंतांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. मात्र, त्यानंतर, मोदींनी गंगा नदीची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला. मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता अन् साफ सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कुंभमेळ्यात स्वच्छता आणि साफसफाईचे काम करुन या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आपण त्यांची सेवा करणे, हे भाग्य समजतो, असे मोदींनी म्हटले. मोदींनी एका खुर्चीवर या सफाई कर्मचाऱ्यांना बसवले होते. तर, स्वत: जमिनीवर बसल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. आपल्या दोन्ही हातांनी मोदींनी या सफाई कर्मचाऱ्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांचे पाय धुतले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सेवा सुश्रुषेनंतर तेथील सफाई कर्माचीर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.