नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी मोदींना आपल्या डोळ्यातील अश्रू रोखणे कठीण झालं होतं. जनऔषधी योजनेचा लाभ मिळालेल्या रुग्णांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी, या योजनेच्या लाभार्थी महिलेला मोदींचे आभार मानताना रडू कोसळले. या लाभार्थीच्या भावना ऐकताना मोदींच्याही डोळ्यात अश्रू आले.
दीपा शाह असं या महिलेचं नाव आहे. सन '2011 साली मला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे मला नीटसं बोलताही येत नव्हतं. यासाठी मला जे उपचार सुरू होते ते खूप महागडे होते. त्यामुळे घर चालवणंही कठिण जात होतं. परंतु, जन औषधी (जेनरिक) घेणं सुरू केलं आणि पैसाही वाचला. यापूर्वी मला महिन्याला 5 हजार रुपयांची गरज पडत होती, पण आता केवळ 1500 रुपयांमध्ये माझे औषधे मला मिळतात, असे या लाभार्थी महिलने मोदींनी बोलताना म्हटले. तसेच, या उरलेल्या 3 हजार रुपयांमध्ये मी माझ्यासाठी फळ आणि इतर गरजेच्या गोष्टी विकत घेऊ शकते, असेही तिने सांगितले.
मोदीजी, मी ईश्वर पाहिला नाही, मला मला तुमच्याच ईश्वर दिसतो, असेही तिने म्हटले. आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत ती रुग्ण महिला मोदींशी संवाद साधत होती. या पीडित रुग्ण लाभार्थीच्या मनातील भावना आणि शब्दांमुळे मोदी भावुक झाले. मोदींना आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाही.
तुमची ध्येयासक्ती हीच तुमचा देव आहे, तुम्ही आजारपणाला पराभूत केलंय, असे म्हणत मोदींनी पीडित रुग्ण महिलेचा आत्मविश्वास बळकट केला. दरम्यान, सध्या मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.