वडोदरा - गुजरातमध्ये भाजपा नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडोदरा शहरातील बोपड येथे ही घटना घडली आहे. झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी सत्तेत असणा-या भाजपा नगरसेवक हसमुख पटेल यांना झाडाला बांधून मारहाण करत आपला संताप व्यक्त केला. हसमुख पटेल यांना झाडाला बांधल्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला असून यामध्ये लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हसमुख पटेल यांचा पांढरा शर्ट फाटलेला दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना अटक केली आहे.
हसमुख पटेल यांच्यावर हल्ला करणारे स्थानिक होते. महापालिकेने कोणतीही नोटीस न देता आमच्या झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांकडून होत होता. स्थानिकांनी वडोदरा महापालिकेत धाव घेत आपली घरं पाडण्याआधी नोटीस का देण्यात आली नव्हती अशी विचारणी केली. यावेळी महापालिका अधिका-यांनी स्थानिक नगरसेवक हसमुख पटेल यांच्याकडे नोटीस पाठण्यात आली होती अशी माहिती दिली.
यानंतर संतापलेल्या स्थानिकांनी हसमुख पटेल यांच्याकडे जाऊन चौकशी केली. मात्र हसमुख पटेल यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा केला. संतापलेल्या स्थानिकांचा मात्र त्यांच्यावर विश्वास बसला नाही. संतापलेल्या लोकांनी हसमुख पटेल यांना फरफटत नेत एका झाडाला बांधलं.
झाडाला बांधल्यानंतर स्थानिकांनी तुम्ही नगरसेवक असूनही कारवाईबद्दल माहिती कशी काय मिळाली नाही ? अशी विचारणा केली. यावेळी हसमुख पटेल मात्र वारंवार आपल्याला काहीच माहिती नव्हतं असा दावा करत होते. व्हिडीओमध्ये संतप्त लोक वारंवार त्यांना विचारणा करताना दिसत आहेत. पण हसमुख पटेल आपल्या म्हणण्यावर ठाम असून कारवाईबद्दल कल्पना नव्हती असा दावा करत आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, झोपडपट्ट्या अवैध असल्याने कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून 70 स्थानिक नागरिकांना अटक केली आहे. नगसेवकाने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याने स्थानिक लोक भडकल्याचा दावा काहीजणांनी केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.