गया - बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलनाला अधिकच हिंसक वळण लागले होते. हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत तीव्र आंदोलन केले. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरुवातीला गया जंक्शनवर उभ्या असलेल्या श्रमजीवी एक्स्प्रेसवर आणि पोलिसांवरही दगडफेक केली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर चक्क राष्ट्रगीत म्हटले. प्रजासत्ताक दिनादिवशीच संतप्त विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, प्रजासत्ता दिनी ही घटना घडल्याने राहुल यांनी व्हिडिओसोबत तसेच कॅप्शन दिले. आपल्या अधिकारांबाबत आवाज उठविण्यासाठी प्रत्येक युवक स्वतंत्र आहे. जे विसरले आहेत, की भारत लोकशाहीचा देश आहे. प्रजासत्ताक होता, प्रजासत्ताक आहे... असे ट्विट राहुल यांनी केले आहे.
करीमगंज रेल्वे स्थानकावर जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीमार करून पांगवले. त्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यांनी स्टेशनवर आधीपासून उभ्या असलेल्या एका ट्रेनच्या डब्यांना आग लावली. गया जंक्शनवर गोंधळ घातल्यानंतर या विद्यार्थ्यांनी करीमगंजजवळ आधीपासून उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला लक्ष्य केले. त्यामध्ये ट्रेनचे काही डबे जळाले.
पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने जिल्हा पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी मोर्चा सांभाळला आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी सातत्याने रेल्वेच्या परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप केला. यावेळी, पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.