नवी दिल्ली - एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील 24 अशोक रोड येथील निवासस्थानी हल्ला करण्यात आला आहे. हिंदू सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या घराबाहेरील नेमप्लेट, लॅम्प आणि काचाही फोडल्या आहेत.
ओवैसींच्या घरावरील हल्ल्याची माहिती मिळताच नवी दिल्लीचे पोलीस प्रमुख घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिंदू सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्याबात संघटनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ओवैसी आणि त्यांच्या बंधुंच्या विधानामुळे कार्यकर्ते संतप्त असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भाजपच जबबदार - ओवैसी
दरम्यान, लोकांच्या या कट्टरतेसाठी भाजपच जबाबदार आहे. जर एका खासदाराच्या घरावर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर, यातून काय संदेश जातो? असा प्रश्न ओवैसी यांनी हल्ल्यानंतर विचारला आहे. ते सध्या युपी दौऱ्यावर असून येथील नेते शिवपाल यादव यांची भेट घेणार आहेत.