गुवाहाटी - आसाम विधानसभेचे नवनियुक्त उप-सभापती कृपानाथ मल्लाह यांच्यासोबत शनिवारी (6 ऑक्टोबर) एक विचित्र घटना घडली. कृपानाथ हे करीमगंज जिल्ह्यातील रताबरीच्या दौऱ्यावर होते. यावेळेस कृपानाथ यांच्या समर्थकांनी हत्तीवरुन त्यांची स्वागत मिरवणूक काढण्याचे आयोजन केले होते. नियोजनानुसार कृपानाथ यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मात्र या मिरवणुकीदरम्यान हत्ती अचानक पिसाळला आणि त्यावर बसलेले कृपानाथ जमिनीवर पडले. सुदैवाने या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
गेल्या महिन्यातच कृपानाथ मल्लाह यांची आसाम विधानसभेच्या उप-सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी ते रताबरीच्या दौऱ्यावर असताना मल्लाह यांचं ज्ल्लोषात स्वागत करण्यात आले. समर्थकांनी हत्तीवरुन त्यांची मिरवणूक काढली. यादरम्यान, काही अंतरापर्यंत व्यवस्थित चालणारा हत्ती अचानक पिसाळला व जोरात पळू लागला. यावेळेस नियंत्रण न राहिल्यानं उप-सभापती जमिनीवर पडले. समर्थकांनी तातडीनं धाव घेत त्यांना लगेचच उचलले. या घटनेत कृपानाथ थोडक्यात बचावले.