ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. 12- देशाच्या काही भागात मान्सून सक्रिय असलेला बघायला मिळतो आहे. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याचंही चित्र बघायला मिळतं आहे. देशाच्या काही भागात जेथे मुसळधार पाऊस सुरू आहे तेथेच पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. आसामला गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं आहे. पावसामुळे ब्रम्हपुत्रा, बराक या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तेथिल 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीचा फटका आसाममधील काझिरंगा नॅशनल पार्कलासुद्धा बसला आहे.
आसाममध्ये असलेल्या काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये पाणी शिरलं असून आर्ध्या नॅशनल पार्कमध्ये पाण्याचं साम्राज्य बघायला मिळतं आहे. यामुळे नॅशनल पार्कमधील प्राणी त्यांच्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात आहेत. नॅशनल पार्कमध्ये साचलेल्या पाण्यामुळे तेथिल काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येते आहे. एअनआय या वृत्तसंस्थेने तेथिल परिस्थितीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतं आहे.
#WATCH Large Parts of Kaziranga National Park in Assam inundated due to incessant rains causing floods pic.twitter.com/MVSPiX5CMK— ANI (@ANI_news) July 12, 2017
संपूर्ण ईशान्य भारतात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मेघालयातील जनजीवन विस्कळीत झालं आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. आसाममध्ये साडेतीन लाखांहून अधिक लोक बेघर झाले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे.
आणखी वाचा
अच्छे दिन ! ढिंच्यॅक पूजाचे सर्व व्हिडीओ युट्यूबवरुन डिलीट
अमरनाथ दहशतवादी हल्ला निंदनीय - अमेरिका
जिओ डेटा हॅक प्रकरणी एक संशयित ताब्यात
जोरदार पावसामुळे नहरलागून ते इटानगर यामधील राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग वाहून गेला त्यामुळे राजधानीच्या शहराशी असलेला संपर्क तुटला. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा जुलांग रस्ताही पुरता खचून गेला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका पापुप पारे जिल्ह्याला बसला आहे. इटानगर व नहरलागून ही दोन्ही मोठी शहरे याच जिल्ह्यात आहेत. बारापानी नदीवरील हा पूरही पाण्याखाली गेला असून, पुराचे पाणी बंदेरवारा, निर्जुली, नहरलागून व इटानगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.
पावसामुळे घरे, रेल्वेमार्ग, रस्ते यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील नदीच्या किनारी तसेच पहाडी भागांत राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्या आहेत. सागली गावात अडकलेले चार रुग्ण, तीन मुले, महिला व विद्यार्थ्यांसह २0 जणांना हेलिकॉप्टरच्या साह्याने नहरलागून येथे हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तिथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत. आसाममध्ये दोन लहान मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. ब्रह्मपुत्रा, दिखोव, जिया भारली, बराक आणि कुशियारा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने आसपासच्या नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. आतापर्यंत त्या भागांत ७७ मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. आसाममधील लखिमपूर, जोरहाट, गोलाघाट, धेमाजी, नागाव, विश्वनाथ, करीमगंज, सोनितपूर या भागांत पावसाचा आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.