ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - जीएसएलव्ही मार्क 3 चे यशस्वी प्रक्षेपण करत अंतराळ संशोधन क्षेत्रात इस्रोने वजनदार यश मिळवले. आता या प्रक्षेपणावेळी रॉकेटवर बसवलेल्या कॅमेऱ्यातून घेण्यात आलेला व्हिडिओ इस्रोने प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ जीएसएलव्ही मार्क 3 ने सेल्फी व्हिडिओ घेतल्यासारखाच भासत आहे. 200 हत्तीच्या वजनाएवढे वजन वाहून नेऊ शकेल, एवढे शक्तिशाली असलेल्या जीएसएलव्ही मार्क 3 चे नामकरण बाहुबली असे करण्यात आहे होते.
सोमवारी जीएसएलव्ही मार्क 3 या प्रक्षेपकाद्वारे इस्रोने जीसॅट-19 या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले होते. या प्रक्षेपकावर बसवण्यात आलेल्या ऑनबोर्ड कॅमेऱ्याने प्रक्षेपणावेळच्या प्रत्येक क्षणाचे चित्रिकरण केले होते. हे चित्रिकरण इस्रोच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. जमिनीवरील कॅमेऱ्यांमधून विविध कोनांतून प्रक्षेपणाचे करण्यात आलेले चित्रिकरण आणि प्रक्षेपकावरील शक्तिशाली कॅमेऱ्यामधून अंतराळातील उड्डाणाचे करण्यात आलेले चित्रण या व्हिडिओमध्ये आहे. प्रक्षेपकावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे हा व्हिडिओ जीएसएलव्ही मार्क 3 च्या सेल्फीसारखा भासत आहे.
एकेकाळी भारताला अवकाशात सोडावे लागणारे जड वजनाचे उपग्रह अमेरिकेतील नासा किंवा रशियाची रॉस्कॉसमॉस अशा बड्या संस्थांच्या मदतीने अवकाशात सोडावे लागत कारण तेवढ्या ताकदीचे अग्णिबाण भारताकडे नव्हते. भारताला ते तंत्रज्ञान मिळू नये म्हणून अमेरिका आणि रशियाने यातही अडथळे आणले. क्रायजेनिक इंजिन असलेल्या अग्निबाणाच्या साहाय्याने जड वजनाचे उपग्रह भारताला प्रक्षेपित करता येऊ नयेत आणि या इंडट्रीवरचे आपले वर्चस्व अबाधित राहावे, हा अमेरिका आणि रशियाचा कारस्थानी उद्योग भारतीय संशोधकांनी आज मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने मोडीत काढला. हे सारे तंत्रज्ञान भारतानेच स्वयंस्फूर्तीने विकसित केले.