ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 4 - तीन दिवसांपुर्वी नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या महिला - तरुणींची सर्वांसमोर छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी आपल्या हाती महत्वाचे पुरावे लागल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आम्ही एमजी रोडवर लागलेल्या 45 सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये एक धक्कादायक व्हिडीओ हाती लागला असून यामध्ये भररस्त्यात एका तरुणीचा विनयभंग होताना दिसत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला ही तरुणी रिक्षामधून उतरुन आपल्या घराच्या दिशेने जात असते. दुसरी मुलगी यावेळी रिक्षाचं भाडं देत असते. रिक्षाचं भाडं देऊन ती तरुणी जात असतानाच एक दुचाकी तिच्या बाजून जाते. दोन तरुण त्या दुचाकीवरुन पुन्हा मागे येतात आणि तिचा रस्ता अडवतात. यामधील एक तरुण खाली उतरतो आणि तरुणी दिशेने जातो. हा तरुण तिला दुचाकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, यावेळी ती आपल्याला सोडवण्याचा पुर्ण प्रयत्न करत असते. दोघे तरुण मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी तरुणी स्वत:ला वाचवते आणि तेथून पळ काढते.
#Correction#CaughtonCam: Two scooter-borne men molest a girl in Kammanahalli area in Bengaluru (Source: Unverified) pic.twitter.com/fAKPfMkoOz— ANI (@ANI_news) 4 January 2017
मी त्या तरुणांना ओळखत नव्हती. घटनेनंतर माझी पर्स गायब झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मला त्यांनी लुटण्याचाही प्रयत्न केला. अशा घटना होतच असतात असं सरकारचं म्हणणं असल्याने मला पोलिसांत जायचं नव्हतं असं पीडित तरुणीने सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला पाठक नावाच्या एका व्यक्तीने हे फुटेज पाठवलं, त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर पोलिसांनी लगेच कारवाईला सुरुवात केली असून तपास सुरु आहे.
काय आहे घटना -
31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला. या घटनेचे फोटो समोर आले असतानाही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
हुल्लडबाजांनी अर्धी रात्र झाल्यानंतर सगळ्या सीमा पार केल्या आणि महिलांना हवं तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलांचा विनयभंग होत होता. परिस्थिती एवढी बिघडली होती की जमलेल्या तरुणी, महिलांनी सँडल, चपला हातात घेऊन मदतीसाठी धावण्यास सुरुवात केली.
कोणताही गुन्हा नोंद नाही -
घटनेचे फोटो समोर आल्यानंतर तसंत प्रत्यक्षदर्शी असतानाही पोलिसांनी मात्र अजून कोणताच एफआयआर दाखल झालं नसल्याचं सांगितलं होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपायुक्त संदिप पाटील यांनी 'महिलांची कुटुंबियांशी चुकामूक झाली होती, त्यांचा शोध लागत नसल्याने मदत मागत होत्या,' असा दावा केला आहे. विनयभंगाचा कोणताच गुन्हा दाखल केला गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
महिलांचे कपडे काढून केला विनयभंग -
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती मात्र वेगळीच होती. चर्च मार्गावर तैनात एका महिला पोलिसाने 'काही हुल्लडबाजांनी दारुच्या नशेत असलेल्या महिलेचे कपडे काढून तिची छेड काढल्याचं', सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमजी आणि ब्रिगेड रोडवर 1500 पोलीस कर्मचारी तैनात होते.
नेत्यांची जीभ घसरली -
कर्नाटकचे मंत्री जी परमेश्वर यांच्यासोबतच अबू आझमी यांनी महिलांनी तोकडे कपडे घातले की अशा घटना होतात असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.