ओडिशा आणि झारखंड येथील आयकर विभागाच्या छापेमारीत (Income Tax Raid) काँग्रेस खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्याकडे तब्बल ३५० कोटींहून अधिक रोकड सापडल्याची घटना घडली. या प्रकरणाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे नोटा मोजणाऱ्या मशिन्सही हे पैसे मोजताना बंद पडल्या होत्या. दरम्यान, या पैशांबाबत धीरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा माझा पैसा नाही, आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या उद्योजकासंबंधीचा पैसा आहे. काँग्रेसचाही याच्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजपाने याप्रकरणावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आयकर विभागाच्या धाडीतील फोटो शेअर करत यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. 'देशवासीयांनी या नोटांचा ढिग पाहा आणि मग काँग्रेस नेत्यांच्या प्रामाणिकपणाची भाषणे ऐका. जनतेकडून जे काही लुटले, त्यातील एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदीची गॅरंटी आहे,' असं पीएम मोदींनी म्हटले होते. तर, देशभरात भाजपा समर्थकांनी या धाडीनंतर काँग्रेसविरुद्ध आंदोलन केले.
ओडिशात बीजेडीचं सरकार असून नवीन पटनायक हे मुख्यमंत्री आहेत. मात्र, काँग्रेस खासदार धीर साहू यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरात मोठी रक्कम आढळून आली आहे. आयकर विभागाने साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथील कार्यालय व घरांवर धाडी टाकू ही रक्कम हस्तगत केली आहे. त्यामुळे, भाजपाने काँग्रेस खासदाराच्या या बेहिशोबी मालमत्तेविरुद्ध देशभर आंदोलन केल होते. ओडिशात भाजपा समर्थकांनी फेक नोटांच्या टोपल्या भरुन हटके आंदोलन केले.
साहू यांच्या बालंगर जिल्ह्यातील घरातून मोठी रोकड आढळून आल्याने ओडिशा भाजपाने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारविरुद्ध निषेध आंदोलन केले. यावेळी, बनावट नोटांनी भरलेल्या टोपल्या ठेऊन काँग्रेस खासदारा निषेध नोंदवला. या टोपल्यांमध्ये ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा होत्या.
काय म्हणाले धीरज साहू
आयकर विभागाच्या (आयटी) छाप्याबाबत (Income Tax Raid) एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धिरज साहू म्हणाले की, 'जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये काँग्रेस (Congress) किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचा पैसा नाही. त्यांची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या पैशाशी माझाही संबंध नाही, हा माझ्या कुटुंबाचा पैसा आहे.' 'आमचे कुटुंब खूप मोठे आहे, त्यामुळे हा सगळा पैसा कुटुंबाचा आहे. जप्त केलेले पैसे माझ्या फर्मचे आहेत, हे मी मान्य करू शकतो. जप्त केलेली रोकड माझ्या मद्य फर्मची आहे, पण सगळा पैसा माझा नाही, तो माझ्या कुटुंबाचा आणि माझ्याशी संबंधित कंपन्यांचा आहे. मी प्रत्येक पैशाचा हिशेब देईन,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.