- भारतात धार्मिक पूजा आणि विविध उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता मानणारा हा देश असल्याने येथे सर्वच जाती-धर्मांच्या नागरिकांच्या उत्सवाचे विशेष आकर्षण असते. त्यातच, देशभरात अनेक शक्तीपीठे असून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थान, शिर्डीचे साई मंदिर, काशी-विश्वनाथ, द्वारका, अयोध्या, १२ ज्योतिर्लिंग यांसह अनेक देव-देवतांच्या पवित्र तिर्थस्थळांना विशेष महत्त्व आहे. दक्षिण भारतातही अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत. या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
दक्षिण भारतात एका विशिष्ट महिन्यात देवींचा उत्सव असतो. त्यासाठी, देवींची महापूजा करत उपवासही धरण्यात येतो. येथील भाविक मनोभावे हा पूजापाठ करतात. येथील प्रत्येक मंदिरांचे स्वतंत्र महत्त्व आहे. सध्या, तेलंगणाच्या वरंगळ येथील भ्रद्रकाली मातेच्या मंदिरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, माता भ्रद्रकालीचा हळदीच्या जलाने अभिषेक करण्यात येतो.
भद्रकाली मातेचा हळदीने अभिषेक करत असताना पुजारी देवीच्या मूर्तीवर हळदीचे जल वाहताना दिसत आहेत. त्यावेळी, देवीचे डोळे उघडे असल्याचे दिसते. मात्र, अभिषेकातील हळद जल वाहताना देवीचे डोळे आपोआप बंद होतात. म्हणजे ते डोळे हळदीच्या पिवळसर रंगात लपून जातात. मात्र, हा व्हिडिओ पाहताना ही जणू चमत्कारच आहे की काय, अशी भावना अनेकांच्या मनात येते.
दरम्यान, आत्तापर्यंत हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे कसे शक्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. काही लोकांच्या मते ही मूर्ती अशा प्रकारे बांधण्यात आली आहे की, त्यावर हळद टाकताच मूर्तीचे डोळे बंद झाल्यासारखे दिसू लागतात. तर, अनेकदा काही ठिकाणच्या चमत्काराच्या दंतकथा तेथील मंदिर आणि भाविकांच्या श्रद्धेचा अविभाज्य घटक बनलेला असतो.