Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(दि.16) अहमदाबादेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा ते वाराणसी धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या इटावा स्थानकावरही लोकांनी वंदे भारतचे जोरदार स्वागत केले. यावेळी इटावा सदरच्या आमदार सरिता भदौरिया देखील वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी स्टेशनवर पोहोचल्या होत्या. मात्र, त्यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली.
वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आमदार सरिता भदौरिया इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या होत्या. वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या, त्यादरम्यान बाचाबाची झाली आणि भदौरिया घसरुन रेल्वे रुळावर पडल्या. यावेळी गाडी तिथेच उभी होती. भाजप महिला आमदार रुळावर पडताच ट्रेनच्या लोको पायलटने हॉर्न वाजवला. फलाटावर उभ्या असलेल्या इतर नेत्यांनी त्यांना गाडी पुढे जाण्यापासून थांबवण्याचा इशारा केला.
भदौरिया रेल्वे ट्रॅकवर पडताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना उचलण्यासाठी उड्या मारल्या. त्यांना घाईघाईने ट्रॅकवरून उचलून फलाटावर नेण्यात आले. या घटनेत त्यांना जोरदार मार लागला आहे. दरम्यान, इटावा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार जितेंद्र डोहरे, भाजपचे माजी खासदार रामशंकर कथेरिया, भाजपच्या राज्यसभा खासदार गीता शाक्य यांच्यासह सपा आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. समाजवादी पक्ष आणि भाजप नेत्यांमध्ये हिरवा झेंडा दाखविण्याची स्पर्धा लागली आणि दोन्ही पक्षांचे समर्थकही आपापसात भिडले.