कोलकाता - पश्चिम बंगालमध्येभाजपाकडून नबान्ना चलो आंदोलन पुकारण्यात आलं असून या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा विरोध करत ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध भाजपा नेत्यांनी हे आंदोलन पुकारले असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. राजधानी कोलकाता येथे भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आदोलन उभारले असून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. मनीष शुक्ला यांच्या हत्येनंतर भाजपा नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचे आवाहन केले असून राज्यपालांनीही याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी, राज्यपाल जयदीप धनखड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना राजभवन येथे बोलावले होते. तर, मनिष शुक्ला यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केली होती.
कैलाश विजयवर्ग यांच्या नेतृत्वात आज कोलकाता येथे मोर्चा काढण्यात आला असून भाजपा समर्थकांनी पोलिसांनी लावलले बॅरीकेट्स पाडून सरकारी कार्यालायात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते, तर सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावेळी, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. मात्र, पोलिसांसह काही गुंडांनी एकत्र येत आमच्यावर दगडफेक केल्याचा आरोप भाजपा नेते कैलाश विजयवर्ग यांनी केला आहे.
मनिष शुक्ला यांची हत्या
मनीष शुक्ला हे रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास टीटागढ पोलीस ठाण्यासमोरील आपल्या भाजपा कार्यालयात बसले होते. त्याचदरम्यान, येथे दुचाकीवर आलेल्या अज्ञांतांनी शुक्ला यांच्या गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुक्ला यांना तात्काळ बॅरेकपूरच्या बी.एन. हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत खालवल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, येथील डॉक्टर्संने मनीष शुक्ला यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात मनीष यांचा मृत्यू झाला असून आणखी एक गंभीर जखमी आहे.
सीबीआय तपासाची मागणी
मनिष शुक्ला यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे. पश्चिम बंगाल भाजपाचे सरचिटणीस संजय सिंह यांनी या हत्याप्रकरणावर राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, बॅरेकपूर येथे 12 तासांचा बंद पुकारण्यात येणार असल्याची घोषणाही सिंह यांनी केली आहे.