स्मार्टफोनचा अचानक स्फोट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात मोबाईलचा स्फोट झाला आहे. मोबाईल दुरुस्त करण्यासाठी दुकानात गेलेल्या ग्राहकाच्या स्मार्टफोनमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला आहे. बॅटरीचा स्फोट होताच सर्वच जण हादरले. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत आहे.
मोबाईलाच्या बॅटरीचा स्फोट होताच आग लागली. दुकानदाराने प्रसंगावधान राखत पटकन आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, जावरा नगरमधील हाथी खाना परिसरात अकरम अन्सारी यांचं मोबाईल दुकान आहे.
अकरम अन्सारी यांच्या दुकानात एक ग्राहक आला होता. अकरम ग्राहकाचा मोबाईल दुरुस्त करत होते. ग्राहकाकडे विवो कंपनीचा मोबाईल होता. बॅटरीची समस्या असल्याचं ग्राहकाने सांगताच अकरम यांनी बॅटरी तपासली. त्यावेळी अचानक बॅटरीचा मोठा स्फोट झाला. बॅटरीचा अचानक स्फोट झालेला पाहून ग्राहक आणि दुकानदार पटकन मागे सरकले. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"