श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर तिचे पार्थिव शरीर नेण्यासाठीही रुग्णावाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी चक्क स्ट्रेचर ट्रॉलीवरुन या महिलेचा मृतदेह घरी नेला. रुग्णालय प्रशासनाने या महिलेच्या मृतदेहासाठी अॅम्ब्युलन्स देण्यास नकार दिला, असा आरोप कुटुबीयांनी केला आहे. तसेच, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचेही नातेवाईकांनी म्हटले आहे. याप्रकरणी एक डॉक्टर अन् नर्सला निलंबित करण्यात आले असून घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा हा गेल्या १० दिवसांतील दुसरा प्रसंग आहे. यापूर्वीही, अनंतनाग जिल्ह्यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. त्यामध्ये मृत महिलेचे कुटुंबीय तिचे पार्थिव शरीर स्ट्रेचर ट्रॉलीवरुन घेऊन जात आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित महिलेला डॉक्टरांनी सीर हमदान येथून अनंतनाग येथील मॅटर्निटी रुग्णालयात दाखल केले होते. या दोन्ही रुग्णालयात संबंधित महिलेवर योग्य उपचार करण्यात आले नाहीत, याशिवाय दुर्लक्ष करण्यात आले. तर, अनंतनाग रुग्णालयात पोहोचताच महिलेला मृत घोषित करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, अनंतनागचे उपायुक्त बशीर अहमद डार यांनी दावा केला की, मृतदेहाची कोविड १९ चाचणी न होण्यासाठी, नातेवाईकांनी परस्पर मृतदेह स्ट्रेचरवरुन घराकडे नेला. जर, कोरोना चाचणीसाठी महिलेचा स्वॅब घेण्यात आला, तर महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी खूप वेळ जाईल, याची भीती नातेवाईकांनी होती. त्यामुळे मृतदेह रुग्णालयातून अशा रितीने नेण्यात आल्याचे डार यांनी ट्विट करुन सांगितले.