ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8 - केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी देशातील महिलांविरोधात वाढता अत्याचार आणि हिंसेला बॉलिवूड इंडस्ट्रीला जबाबदार ठरवलं आहे.
"बॉलिवूड आणि सिनेमांमध्ये महिलांशी संबंधित दाखवण्यात येणा-या असभ्य दृश्यांमुळे त्यांच्याविरोधात अत्याचार आणि हिसेंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे", असे वक्तव्य त्यांनी गोवा फेस्ट 2017मध्ये केले.
सिनेमांमध्ये रोमान्सची सुरुवात छेडछाडीपासून होते. एक तरुण आणि त्याचे मित्र महिलेला घेराव घालत तिच्या पाठी-पुढे चालतात, तिचा अपमान करतात, अयोग्य पद्धतीने तिला स्पर्श करतात आणि त्यानंतर महिला त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडते. या पार्श्वभूमीवर, मनेका गांधी यांनी सिनेमा आणि जाहिरात समूहांना महिलांची चांगली प्रतिमा दाखवण्याचा आवाहनही यावेळी केले.
या कार्यक्रमात मनेका गांधी त्यांनी असेही सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ" हे अभियान बिहार आणि जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात यशस्वी होत आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांच्या मानसिकतेमुळे तर बिहारमध्ये वारंवार होणा-या प्रशासकीय बदलामुळे हे अभियन यशस्वी होऊ शकलं नाही. बिहारमध्ये जिल्हाधिका-यांचे दर तीन महिन्यांनंतर बदली होती आणि यामुळे या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी कुणी इच्छुक नाही".