ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलच्या गॉस्पल सिंगर पेड्रो हेनरिक याचा परफॉर्मन्स करतानाच मृत्यू झाला आहे. 30 वर्षीय पेड्रो बुधवारी एका धार्मिक कार्यक्रमात परफॉर्म करत होता. गाणी गाताना आणि प्रेक्षकांशी संवाद साधताना तो खूप खूश होता. मात्र यानंतर अचानक तो जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. ही संपूर्ण घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.
व्हिडिओमध्ये पेड्रो हेनरिक स्टेजवर उभे राहून गाताना दिसत आहे. तो प्रेक्षकांसोबत मजा करतानाही दिसत आहे. पेड्रो Vai Ser Tão Lindo नावाचं गाणे गात होता. प्रेक्षकांमध्ये उभे असलेले चाहतेही त्याच्यासोबत गाण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळाने तो थांबला, त्याचा तोल गेला, स्टेजवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. पेड्रो हेनरिकसोबत उभा असलेला गिटारिस्ट त्याच्याकडे बघतच राहिला.
स्टेजवर पडल्यानंतर पेड्रो हेनरिकला तातडीने जवळच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. त्याला क्लिनिकमध्ये मृत घोषित करण्यात आले. असे सांगितले जात आहे की स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी जाण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राला सांगितले होते की तो खूप थकला आहे. हेनरिकच्या रेकॉर्ड लेबल टोडाह म्युझिकने रेडिओ 93 ला सांगितलं की, गायकाला हार्ट अटॅक आला होता, ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.
30 वर्षीय पेड्रो हेनरिकला एक लहान मुलगी आहे. पेड्रो हेनरिकने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं गायला सुरुवात केली. यूट्यूबवर अनेक व्हिडीओ शेअर केल्यानंतर 2015 मध्ये त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर त्याने स्थानिक बँडमध्ये सहभाग घेतला. 2019 पर्यंत बँडसोबत राहिल्यानंतर, हेनरिकने त्याच्या सोलो करियरला सुरुवात केली.