मुंबई - सोशल मीडियावर सध्या प्रमोद मेहरा या युवकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे. रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो. व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचा संवाद अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दिग्दर्शक विनोद कापरी यांनी शेअर आणि शुट केलेल्या या व्हिडिओला मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर, या तरुणाला काय अनुभव आले ते त्याने सांगितले आहेत.
युवक प्रदीप मेहरा याची विनोद कापरी यांनी दुसऱ्या दिवशीही भेट घेतली. मॅकडोनाल्ड आऊटलेटमधून तो बाहेर येत आल्यानंतर विनोद कापरी यांनी युवकाशी संवाद साधल्याचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे. मला अनेकांचे फोन आले, गावाकडूनही मित्रांचे फोन्स येत आहेत. भावा तू आग लावली... असे मित्रांनी म्हटले. तर, सैन्यातूनही काहींचे फोनकॉल्स आले आहेत. 2-3 चुकीच्याही कमेंट व्हिडिओवर आल्या असून याला काश्मीरमध्ये पळवा, मग कळेल असेही एकाने म्हटल्याचे प्रदीप मेहराने सांगितले.
मेहनत के आगे दुनिया झुकती है... एवढचं मला सांगायचं आहे. मला दररोज अनेकजण वाटेत भेटतात, लिफ्ट देण्यासंदर्भात विचारतात. काहीजण कारवाले भेटतात, काहीजण बाईकवरही लिफ्ट देण्याचं विचारतात, असेही प्रदीपने दुसऱ्या व्हिडिओत बोलताना सांगितले.
पहिल्या व्हायरल व्हिडिओत एक तरुण खांद्याला बॅग लावून रस्त्यावरुन पळताना दिसत आहे. पळत असताना मागून एक कार येते आणि त्यातील व्यक्ती त्याच्याशी गप्पा मारते, त्याला घरी सोडण्याची इच्छा दर्शवते. पण तो त्यासाठी नकार देतो. या दोघांमधील संवादाने अनेकांच्या काळजाला हात घातला आहे. त्यामुळेच, अनेक दिग्गजांनी या तरुणाचं कौतूक केलंय. विनोदी कापरी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. त्यात, हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. कारमध्ये बसायला तो नकार देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरू राहतो. या दोघांमधील संवाद ऐकून अनेकजण भारावले. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजनसिंग यांनीही ट्विट करुन या तरुणाच्या जिद्दीचं कौतूक केलंय. हेच खरं सोनं.. असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
चॅम्पियन असेच बनतात, मग ते खेळाचे मैदाना असो किंवा आयुष्यात आणखी वेगळं काही करायचं असो, तो विजेताच बनणार. खरंच, हेच खरं सोनं आहे, असे म्हणत हरभजन सिंगने प्रदीपचं कौतूक करत विनोद कापरीचे व्हिडिओसाठी आभार मानले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही प्रदीप मेहराचं कौतूक केलंय. रिस्पेक्ट, सॅल्यूट, तूच खरं सोन आहेस प्रदीप. भविष्यात तू भारतीय सैन्याचा एक योद्धा बनशील, असे म्हणत इंडियन आर्मीच्या अधिकृत ट्विटर हँडललाही चंद्रशेखर यांनी टॅग केलंय.
माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी
दिग्दर्शक विनोद कापरी यांनी प्रदीप मेहराची स्टोरी शेअर केली, त्याबद्दल त्याचं आभार. प्रदीप शाब्बास, आशीर्वाद आणि शुभेच्छा... असे ट्विट उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केले आहे.
प्रदीप मेहरा असं या रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे. प्रदीप दहा किलोमीटर धावत जात आहे. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धावून तो घरी जाणार. त्यानंतर जेवण बनवणार आणि मग तो ते खाणार. तो आपल्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दररोज प्रदीप दहा किलोमीटर धावत घरी जातो. पुढे जाऊन त्याला सैन्यातमध्ये भरती व्हायचं आहे. त्यासाठी त्याने धावण्याचा सराव सुरू ठेवला आहे. घरी जाऊन जेवण करणार कधी, तो ते खाणार कधी म्हणून त्याला जेवणाहीची ऑफर देतात.
संवादातून समोर आली जीवन संघर्ष कथा
मी जर तुमच्याबरोबर जेवलो तर माझा मोठा भाऊ काय खाईल, असा प्रश्न प्रदीप विचारतो. हा व्हिडीओ शेअर करताना विनोद कापरी यांनी हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर रात्री बारा वाजता मला हा मुलगा खांद्यावर बॅग घेऊन वेगाने पळताना दिसला. मी विचार केला की काही समस्या असेल, आपण त्याला लिफ्ट देऊ. पण या मुलाने वारंवार लिफ्ट घ्यायला नकार दिला. कारण ऐकलंत तर या मुलाच्या प्रेमात पडाल असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.