नैनीताल - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता श्रावण सरींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पर्यटनस्थळांना मोठी गर्दी करत आहेत. मात्र, महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांनी मोठे अपघात होत आहे. गेल्याच महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून 9 पर्यटकांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर, आता उत्तराखंडमधील नैनीतालचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने 14 प्रवाशांचा जीवा वाचला आहे.
पावसाळा सुरू असल्याने सध्या पडझड सुरू असून डोंगर, दऱ्यांमधील प्रदेशात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नैनीताल येथील एका घाटातून प्रवास करत असताना बसमधील प्रवाशांसमोरच डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमधून 14 प्रवासी प्रवास करत होते. व्हिडिओत डोंगर कोसळताना दिसत असून रस्त्यावरच मातीचा ढीगही लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सुदैवाने बसमधील प्रवाशांचा जीव वाचला आहे. कारण, काही मिनिटांच्या अंतरावरच ही बस उभी होती.
बसमधील प्रवाशी डोंगर कोसळताना पाहून भयभीत झाल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. एकीकडे दरड कोसळत असताना दुसरीकडे प्रवाशी बसमधून घाईघाईने बाहेर पडताना दिसत आहेत. आपला जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची ही धडपड एका व्हिडिओत कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.