गेल्या काही काळामध्ये हनिट्रॅपच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, बेलदोर येथील जेडीयू आमदार पन्नालाल सिंह पटेल यांचे पुत्र नुतन पटेल हे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. त्यानंतर एक तरुणी त्यांच्यासोबत गोड गोड बोलू लागली. यादरम्यान सदर तरुणीने व्हिडीओ कॉलिंगवर बोलण्यास सांगितले. मग नूतन पटेल यांनी जेव्हा व्हिडीओ कॉलिंगवर बोलण्यास सुरू केलं, तेव्हा सदर महिलेचा अश्लील व्हिडीओ पाहून नूतन पटेल यांनी फोन कट केला. मात्र काही वेळेतच त्यांच्या मोबाईलवर अश्लील फोटो पाठवला गेला. तसेच एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. तसेच खंडणी न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
आता या प्रकरणात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देणार असल्याचे नूतन पटेल यांनी सांगितले. हनीट्रॅपमध्ये सुंदर तरुणींचा वापर करून कुठल्याही व्यक्तीकडून काही गुपितं मिळवली जातात. तसेच व्हिडीओ किंवा मेसेजच्या माध्यमातून ब्लॅकमेल केलं जातं. यामध्ये तरुणीन नेहमी लक्ष्य केलेल्या व्यक्तीला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून काही विशेष माहिती मिळवतात, तसेच या माध्यमातून ब्लॅकमेल करतात.
त्यामुळे हनिट्रॅपपासून सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जातं. विविध माध्यमातून याबाबत जागरुकता पसरवली जाते. तसेच कुठल्याही अनोळखी महिलेसोबत मैत्री करू नका, असंही सांगितलं जातं.