नवी दिल्ली - वादग्रस्त विधान करुन चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ''राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे आज सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार का?'', असे वादग्रस्त विधान स्वरा भास्करनं केले आहे. दरम्यान, हा गंभीर आरोप करताना स्वरानं कोणाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही. स्वराच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वरा भास्करनं हे वक्तव्य केले आहे. देशभरात सुरू असलेल्या कथित नक्षलवादी 'थिंक टँक' अटकसत्रासंदर्भात स्वराचे विधान जोडण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना स्वरानं अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ''आपल्या देशात जेव्हा महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याची हत्या करण्यात आली, तेव्हा काही लोक आनंद उत्सव साजरा करत होते. आज तिच लोक सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार आहोत का?. तर याचे उत्तर नाही असंच आहे. दुसरीकडे सध्या काहीही झालं की तुरुंगात टाका असे म्हटले जाते.''
रक्तासाठी तहानलेला समाज बनणे ही चांगली गोष्ट नाही, अशी टीकादेखील तिनं यावेळी केली.भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे.
दरम्यान, मंगळवारी (28 ऑगस्ट) कथित नक्षलवादी 'थिंक टँक' असल्याच्या संशयातून कवी वारा वारा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, वेरनोन गोन्झाल्विस आणि सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना 6 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्वरा भास्करनं यापूर्वीही सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपलं मत व्यक्त केले आहे. यामुळे अनेकदा तिच्यावर सडकून टीकादेखील झाली आहे.