नवी दिल्ली - बिहारच्या चंपारण जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीच होणार मुख्याध्यापक म्हणत थेट शिक्षणाधिकाऱ्यांसमोरच दोन शिक्षकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आपल्यालाच मुख्याध्यापक करा, या मागणीसाठी दोन शिक्षक अधिकाऱ्यांसमोर एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. आपल्याला मुख्याध्यापक होण्याची इच्छा असून आपणच त्यासाठी सर्वात पात्र उमेदवार आहोत, असा या दोघांचाही दावा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील शिक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी शाळेत आले होते. त्यावेळी दोन शिक्षक त्यांना भेटले आणि आपणच कसे मुख्याध्यापक होण्यासाठी पात्र आहोत, हे पटवून द्यायला त्यांनी सुरुवात केली. याच वेळी दोघांमधील वाद पुढे विकोपाला गेला आणि थेट तुफान राडाच पाहायला मिळाला. हे पाहून अधिकाऱ्यांना देखील मोठा धक्काच बसला. सुरुवातीला शिक्षक आपली बाजू पटवून देत होते. मात्र काही वेळावे ते एकमेकांवर टीका करू लागले आणि एकमेकांना मारायला सुरुवात केली.
व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
शाळेतच हा प्रकार घडल्याने शिक्षकांवर टीका केली जात आहे. शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांदेखत या दोन शिक्षकांमध्ये जोरदार जुंपली. एकमेकांची कॉलर पकडून त्यांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारले. ग्रामस्थांनीही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. इतर शिक्षकांनी पुढाकार घेत दोघांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे प्रकरण शांत झालं. सध्या या घटनेचा एक व्हि़डीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.