भोपाळ - मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तहसीलमधील नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांना चक्क सर्कशीतील कसरती किंवा डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सर्कशीत किंवा डोंबाऱ्याच्या खेळात आपण नेहमीच पोटासाठी होणाऱ्या जीवघेण्या कसरती पाहतो. मात्र, इथं गावात पोहोचण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना डोंबारी बनाव लागत असल्याचं दिसतंय.
भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झाल आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून सोमवारी पहाटे 2.51 वाजता चांद्रयान 2 चे उड्डाण होणार आहे. चंद्राकडे झेपावणाऱ्या या अवकाश यानाचे देशभरातून कौतुक होत आहे. भारत एकीकडे चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, दुसरीकडे आजही गावांना जोडणारा रस्ता नसल्याचे दिसून येते. तर, पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरांमध्ये एका गावचा दुसऱ्या गावाशी संपर्कही तुटतो. या परिस्थितीत गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गावकऱ्यांना आपल्या गावात जाण्यासाठी चक्क दोरखंडावरुन जीव धोक्यात घालून चालावं लागत आहे. या व्हिडीओत दोन महिलाच चक्क दोन गावांना जोडण्यासाठी, दोन रस्त्यांना जोडण्यासाठी लावलेल्या दोरीवरुन चालताना दिसत आहेत. दोन हात वरील बाजून आणि दोन पाय खालील बाजूस दोरीशी जोडले आहेत. या दोरीच्या खाली पुराचे पाणी दिसत असून जीवघेणी कसरत करुन मार्ग काढावा लागत आहे. एका हातात डब्बा आणि एक हाता दोरीला घट्ट बांधलेला दिसतोय. तर, एक वयस्व महिला आपल्या खांद्यावर लहानग्या मुलाला घेऊन या दोरखंडावरुन चालताना दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे दोन मार्गांमध्ये खंड पडला असून तेथे जाण्यास पुलही नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, दुसरीकडे शेवटच्या गावापर्यंत आजही रस्ता पोहोचला नसल्याचे या व्हिडीओतून दिसून येते.
मध्य प्रदेशातील मंडला येथेही पावसाच्या पुरात 5 मुले वाहून गेले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढावरणारी पुरावह परिस्थिती कित्येक जीवांना घेऊन जाते. मात्र, या निसर्ग आपत्तीपुढे सरकार हतबल झाल्याचे दिसून येतं.