Chandrayaan-3:भारताची महत्वकांशी चंद्र मोहीम चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रावर उतरल्यानंतर 2 तास 26 मिनिटांनी विक्रम लँडरमधून 'प्रज्ञान' रोव्हर बाहेर पडले आणि आपले काम सुरू केले. इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
चंद्रयान-3 मधील 'प्रज्ञान' रोव्हर चंद्राच्या गर्भात दडलेली रहस्ये शोधण्याचे काम करणार आहे. यासाठी रोव्हर चंद्रावर इकडे-तिकडे फिरतोय. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये रोव्हर 'प्रज्ञान' चंद्रावर फिरताना दिसत आहे. प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे आठ मीटर चालला आहे. रोव्हरमध्ये बसवण्यात आलेली उपकरणे सुरू करण्यात आली असून आता रोव्हरने काम सुरू केले आहे.
चंद्रयान-3 चे लँडर बुधवारी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यानंतर दोन तास 26 मिनिटांनी रोव्हरही त्यातून बाहेर आला आणि काम सुरू केले. रोव्हर हा सहा चाकांचा रोबोट असून, तो चंद्रावर संशोधन करणार आहे. रोव्हरची लाइफ 1 चंद्र दिवस आहे. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो.
प्रज्ञान रोव्हर काय काम करेल?
प्रज्ञान रोव्हरमध्ये दोन पेलोड आहेत. पहिले लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) आहे. हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. खनिजांचाही शोध घेईल. प्रज्ञानावरील दुसरा पेलोड अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आहे. हा धातुंच्या रचनेचा अभ्यास करेल. उदा. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, कथील आणि लोह.
मागील मिशनमधून काय मिळाले?इस्रोने 2008 मध्ये आपली पहिली चंद्र मोहीम चंद्रयान-1 प्रक्षेपित केली होती. त्यात फक्त ऑर्बिटर होते. त्या ऑर्बिटरने 312 दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली होती. चंद्रयान-1 ही जगातील पहिली चंद्र मोहीम होती, ज्याने चंद्रावर पाण्याच्या उपस्थितीचा पुरावा दिला होता. यानंतर 2019 मध्ये चंद्रयान-2 लॉन्च करण्यात आले. ऑर्बिटरसोबत लँडर आणि रोव्हरही पाठवण्यात आले. हे मिशन अयशस्वी ठरले.