कालवकुर्ती: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Election 2023) पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी रविवारी(दि.26) तेलंगणातील कालवकुर्थी येथे जाहीर सभा घेतली. त्यांच्या भाषणावेळी गोंधळ घालणाऱ्या गर्दीवर खर्दे संतापले आणि त्यामुळेच खर्गेंनी उपस्थितांची चांगलीच खरडपट्टी काढली.
काँग्रेस अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या आश्वासनांची यादी वाचत होते, यावेळी काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर खर्गे चांगलेच संतापले. 'शांत बसा...ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर बाहेर व्हा. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाषण देत आहेत, मध्ये-मध्ये बोलू नका,' अशा स्वरुपात खर्गेंनी उपस्थितांना फटकारले. आता यावरुन भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा खर्गेंना “रबर स्टॅम्प अध्यक्ष” म्हटले आहे.
खर्गे रबर स्टॅम्प अध्यक्ष:-
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी खर्गेंच्या भाषणातील क्लिप पोस्ट केली आहे. 'हे सामान्य आहे. काँग्रेसचे अध्यक्ष असूनही खर्गे यांचा त्यांच्या सर्व जाहीर सभांमध्ये अपमान केला जातो. त्यांचे कार्यकर्ते त्यांना अपेक्षित आदर देत नाहीत. गांधी परिवाराने त्यांना रबर स्टॅम्प अध्यक्ष बनवले आहे. राजस्थानमधील सर्व जाहिरातींमध्ये त्यांची छायाचित्रे गायब झाली किंवा अतिशय छोट्या आकाराची करण्यात आली. खर्गे दलित आहेत म्हणून काँग्रेस त्यांचा अपमान करत आहे का?' असा सवालही त्यांनी यात विचारला.