बंगळुरू - कर्नाटमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी करुन, मुख्यमंत्रिपद स्वीकारुन आनंदात नसल्याचं मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी जाहीररित्या सांगितले आहे. 'आघाडी सरकारचे विष पचवत आहे, मनात आले तर दोन तासांत पद सोडू शकतो', असे वक्तव्य त्यांनी शनिवारी केले आहे. कर्नाटकमध्ये आघाडीचं सरकार चालवणं म्हणजे विष पिण्यासारखं सारखे आहे, असं विधान खुद्द एच.डी.कुमारस्वामी यांनी केले आहे. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींचं कथन करताना कुमारस्वामी भावूक झाले आणि यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबाबत जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. त्यावेळी कुमारस्वामींनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.
'कार्यकर्त्यांना वाटत आहे त्यांचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे. पण खरं सांगतो. मी आनंदी नाही. माझ्या मनातील वेदना सांगता येत नाहीत. विषापेक्षाही त्या जहाल आहेत. एवढंच सांगतो, सध्या जे काही चाललंय त्यामुळे मी खूश नाही,' असं सांगत कुमारस्वामी अक्षरश: जाहीर सभेत रडू लागले.
यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दलही आपली व्यथा बोलून दाखवली. 'शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी अधिकाऱ्यांची किती मनधरणी करावी लागली हे मलाच माहीत आहे. आता 'अण्णा भाग्य स्किम'मध्ये 5 किलो तांदूळऐवजी त्यांना 7 किलो तांदूळ हवे आहेत. त्यासाठी 2500 कोटी रूपये लागणार आहेत. एवढा पैसा मी कुठून आणू? कर लावल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे. एवढं सर्व होऊनही माझ्या कर्जमाफीच्या योजनेत स्पष्टता नसल्याचे लोक म्हणतात. मनात आलं तर मी दोन तासांत मुख्यमंत्री पद सोडू शकतो. आता या पदावर मी किती दिवस राहिल हे देवच ठरवेल,' असंही ते म्हणाले.
सोशल मीडिया पोस्टमुळे कुमारस्वामी दुःखी?कुमारस्वामी भावूक होण्यामागील कारण सोशल मीडियावरील पोस्ट असल्याचं म्हटलं जात आहे. 'कुमारस्वामी माझे सीएम नाहीत,' अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे कुमारस्वामी अस्वस्थ झाल्याचे बोलले जात आहे.