नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआय कोठडी देऊ नका. त्यांना न्यायालयीन कोठडी देऊन तिहार तुरुंगात पाठवा, अशी तयारी सीबीआयने केली असून तशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या भवती सीबीआयचा फास अजुनच आवळा जात आहे. मात्र चिदंबरम या स्थितीतही बिनधास्त दिसत असून सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. चिदंबरम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत त्यांनी एका शब्दांत मोदी सरकारला टोला लगावला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. ५ सप्टेंबर रोजीच आता या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी एका पत्रकाराने चिदंबरम यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरुवातीला त्यांनी उत्तर देणे टाळले. मात्र पत्रकाराने पुन्हा एकदा चिदंबरम यांना प्रश्न विचारला. सध्याच्या घडामोडीवर आणि तुम्हाला झालेल्या अटकेवर काय सांगाल, असं पत्रकाराने त्यांना विचारले होते.
पत्रकाराच्या प्रश्नावर न रागवता चिदंबरम यांनी हाताचे पाच बोटं दाखवली आणि ५ टक्के, असा उच्चार केला. त्यावर पत्रकारही गोंधळून गेला. पत्रकाराने पुन्हा एकदा चिदंबरम यांना विचारले की, ५ टक्के म्हणजे काय, त्यावर तिथे उपस्थित एकाने देशाची जीडीपी असल्याचं सांगितलं. त्यानंतर चिदंबरम निघून गेले. हे उत्तर जरी पत्रकाराला असले तरी मोदी सरकावर ही मोठी टीका मानली जात आहे.
२०१९-२० या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट ५ टक्क्यांवर आला आहे. याआधी हा ग्रोथ रेट ५.८ टक्के होता. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचंच हे आकडे सांगत आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.