नवी दिल्ली - देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आज गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांचा मंदिरात जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. या व्हिडिओत ते पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान करुन सपत्नीक द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या दर्शनासाठी जात असल्याचं दिसून येतं. सरन्यायाधीश येत असल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यापुढे मंदिरातून बाहेर आलेले पोलीस पायात बुट घालण्यासाठी चांगलीच धावपळ करताना व्हिडिओत दिसून येतात. सरन्यायाधीशांसमोर पुजारीही धावताना दिसून येतात, तर सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही दिसून येतो. जामनगर आणि द्वारका या दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी व सुरक्षा अधिकारी त्यांच्या सेवेत व सुरक्षेत तैनात होते.
जिल्हाधिकारी अशोक शर्मा आणि पोलीस अधीक्षक नितेश पांडेय यांनी सीजेआय चंद्रचूड यांचे स्वागत केले. सरन्यायाधीशांनी सपत्नीक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहणही केले. मंदिरातील पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या चरण पादुकांची पूजा केली. सोमनाथ मंदिरातही त्यांच्याकडून पूजा-आरती करण्यात येणार होती. ते राजकोटहून सोमनाथ मंदिरासाठी निघालेही होते. मात्र, त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं नाही. त्यामुळे, त्यांच्या शेड्युलमध्ये बदल करावा लागला. त्यानंतर, त्यांनी द्वारकाधीश मंदिरात येऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले.