Video: मुख्यमंत्री राजीनामा देण्यासाठी बंगळुरूला निघाले, वाटेत काँग्रेसच्या जल्लोषात अडकले, पुढे काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 03:13 PM2023-05-13T15:13:58+5:302023-05-13T15:18:37+5:30
कर्नाटक विधानसभेचा निकाल स्पष्ट होऊ लागताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या ताफ्यासह बंगळुरुकडे निघाले होते.
कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला एवढा घवघवीत विजय मिळालाय की आता त्यांना जेडीएसच्या कुबड्या घेण्याचीही गरज उरलेली नाहीय. यामुळे कर्नाटकातच नाही तर देशाच्या विविध राज्यांत काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपली हार मान्य केली आहे, तसेच आज रात्री पर्यंत ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
कर्नाटक विधानसभेचा निकाल स्पष्ट होऊ लागताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या ताफ्यासह बंगळुरुकडे निघाले होते. परंतू. हावेरीमध्ये वाटेत काँग्रेस कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत होते. या जल्लोषात बोम्मईंची कार अडकली. बराच वेळ बोम्मईंची कार थांबलेली होती. पोलिसांनी जोवर कोंडी सोडविली तोवर बोम्मईंनी कारची काच खाली करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हात मिळविला, शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांचा ताफा पुढे निघून गेला.
#WATCH | Karnataka CM Basavaraj Bommai's convoy gets stuck in Haveri as Congress workers cheer on in the route and celebrate their party's comfortable win in #KarnatakaElectionspic.twitter.com/i8nw6FAH4y
— ANI (@ANI) May 13, 2023
काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोषात असताना बोम्मई त्यांना हात दाखवत होते. बोम्मई आल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्ते देखील जोरजोरात घोषणाबाजी करत होते. काही कार्यकर्त्यांनी पुढे येऊन बोम्मईंशी संवाद साधला. यामध्ये हार-विजयाचा लवलेशही दिसत नव्हता.