Fight Between Two Elephants: हत्ती आकाराने मोठा असला तरी, तो अतिशय शांत प्राणी मानला जातो. पण, कधी हत्तीला राग आला, तर त्याच्या जवळ जायची कोणाची हिम्मत होत नाही. सध्या सोशल मीडियावरकेरळच्या एका मंदिरातील व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात दोन हत्ती एकमेकांना भिडल्याचे दिसत आहेत. केरळमधील त्रिशूरच्या अरात्तुपुझा उत्सवात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिशूरमध्ये अरात्तुपुझा उत्सव सुरू होता, यावेळी अचानक दोन हत्तींचे भांडण सुरू झाले. एका हत्तीने दुसऱ्या हत्तीवर हल्ला चढवला, तर दुसऱ्यानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, या हत्तींचे भांडण सुरू होते, तेव्हा हत्तींवर काही लोकही बसलेले होते. मंदिरात अचानक हत्ती एकमेकांशी भिडल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागला.
पाहा video:-
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेत काही भाविक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळानंतर महावतांनी त्या दोन्ही हत्तींना एकमेकांपासून दूर नेऊन शांत केले. अचानक हत्ती का बिथरले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका हत्तीने दुसऱ्याला आपला प्रतिस्पर्धी मानले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातोय.