राजधानी दिल्लीत कार्यरत असलेल्या जिल्हाधिकारी लक्ष्य सिंघल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, पश्चिम दिल्लीत कलेक्टर असलेल्या लक्ष्य सिंघल यांच्या खुर्चीवर एका पुजारी महोदयांना बसवण्यात आलं आहे. तसेच, बाजुलाच लक्ष्य सिंघल हात जोडून उभे आहेत, असे दिसते. या व्हिडिओवरुन नेटीझन्सने कलेक्टर महोदयांची झाडाझडतीच घेतली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हा मान-सन्मानाचा सोहळा रंगल्याने अनेकांनी उलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुजारी महाशयांना आयतीच जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची मिळाली. भक्तीत शक्ती असते, हे खरंय. पण, धर्मांधता वाढविण्यात सर्वात मोठा हात उच्चशिक्षित लोकांचा आहे. मात्र, दुर्दैवाने अशिक्षीत लोकांवरच याचं खापर फोडलं जातं, असे एका युजर्संने या व्हिडिओवर कमेंट करुन म्हटले आहे. एका युजर्सने ही हिंदुराष्ट्राची रंगीत तालिम असल्याचं म्हटलं. तर, हे सर्वकाही आपल्या घरी करायला हवं, असा सल्लाही एका युजर्सने दिला आहे.
दरम्यान, लक्ष्य सिंघल यांनी केलेली कृती बहुतांश लोकांना आवडली असून काहींनी त्यांचे समर्थनही केले आहे. सनातन धर्माचा हाच सन्मान असल्याचंही एकाने म्हटलं आहे. मात्र, जिल्हाधिकारी महोदयांनी अशाप्रकारे एखाद्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीला, पुजाऱ्यांना आपल्या खुर्चीवर बसवणे कितपत योग्य?, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.