अहमदाबाद: विविध प्रकारचे गंभीर गुन्हे असलेल्या एका आरोपीला अहमदाबाद पोलिसांनी एका ढाब्यावरून अटक केली आहे. साध्या वेशातील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गुन्हेगाराला जराही चाहूल लागू न देता पोलिसांनी अतिशय शिताफीनं त्याला अटक केली. या गुन्हेगारावर शस्त्र लुटीसह वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
२९ वर्षीय गुन्हेगाराला अटक करत असतानाच सीसीटीव्ही फुटेज अहमदाबाद पोलिसांनी जारी केलं आहे. त्यात गुन्हे शाखेचे अनेक अधिकारी दिसत आहेत. साध्या वेशातील अधिकाऱ्यांनी ढाब्यावर बसलेला आरोपी किशोर पांचाळ उर्फ केकेला अटक केली. तो मूळचा बनासकांठाचा रहिवासी आहे. त्याच्याकडे पोलिसांना सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल, दोन मॅगझिन आढळून आले.
'गुन्हे शाखेकडून वाहन चोरीच्या दोन प्रकरणांचा तपास सुरू होता. त्या प्रकरणी चांदखेडा आणि साबरमती पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले होते. त्यात केकेचा हात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही त्याचं लोकेशन शोधून काढलं,' अशी माहिती अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अमरपुरा गावात असलेल्या एकता रेस्टॉरंट परिसरात २७ जूनला पोलिसांनी केकेला अटक केली. केकेचा ठावठिकाणा लक्षात घेऊन पोलिसांनी ढाबा परिसरात फिल्डिंग लावली. साध्या वेशातील पोलिसांनी केकेच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरोधात अहमदाबादमधील १० पोलीस ठाण्यांसह बनासकांठा आणि राजस्थानमध्ये गुन्हे दाखल आहेत. शस्त्र लूट, वाहन चोरी, खंडणी, घरफोडी, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे केकेच्या नावावर आहेत.