बंगळुरु : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, तर जनावरांना सुद्धा पुराचा सामना करावा लागत आहे.
कर्नाटकातील बेळगाव जिल्हात पूराचा फटका बसला आहे. या पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबत येथील नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मगरी नागरी वस्तीत आल्याचे दिसून आले. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बेळगावमधील रायबाग तालुक्यात पुरामुळे एका मोठ्या मगरीने स्वत:चा जीव वाचविण्याठी घराच्या छताचा असरा घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातमधील मुसळधार पावसामुळे येथील विश्वामित्री नदीला पूर आला होता. पुराचे पाणी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये घुसले असाता पुराच्या पाण्यासोबत मगरीही आल्या वस्तीत आल्याचे दिसून आले होते. तसेच,येथील सयाजीगुंज भागात एका मगरीने कुत्र्यांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या राज्यांत आत्तापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लाखहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाटकात बेळगाव, बगलकोट, विजयपुरा, गडग, उत्तर कन्नड, रायचूर, यादगिर, दक्षिण कन्नड, उड्डपी, चिकमंगळुर आणि कोडागु जिह्यात पुराचे संकट ओढावले आहे.