दिवाळीच्या निमित्ताने लोक मोठ्या संख्येने आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. अनेकांना ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच, डब्यांच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. सूरतमध्ये स्टेशनवर एवढी गर्दी होती की ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले.
सूरतरेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत पश्चिम रेल्वे वडोदरा येथील पोलीस अधीक्षक सरोजिनी कुमारी यांनी सांगितलं की, सूरत रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. याच दरम्यान एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये रेल्वेचे कन्फर्म तिकीट असूनही तो ट्रेनमध्ये प्रवेश करू शकत नाही. गुजरातमधील वडोदरा येथे ही घटना घडली आहे असं म्हटलं.
"भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन आजकाल सर्वात वाईट आहे. माझी दिवाळी खराब केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे कन्फर्म केलेले थर्ड एसी तिकीट असले तरीही तुम्हाला हेच मिळते. पोलिसांकडून मदत मिळाली नाही. माझ्यासारख्या अनेकांना तिकीट असूनही ट्रेनमध्ये चढता आले नाही. ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की, मला आत प्रवेश करता आला नाही. रेल्वेच्या डब्याचा दरवाजाही बंद केला होता. ते कोणालाही ट्रेनच्या डब्यात येऊ देत नव्हते. एवढा मोठा जमाव पाहून पोलिसांनीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिला" असं प्रवाशाने म्हटलं आहे.
वडोदराच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने (डीआरएम) सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत रेल्वे पोलिसांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले आहे. सूरतमध्ये शनिवारी चेंगराचेंगरी झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. रेल्वे स्थानकावर जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे काही प्रवाशांना घाबरून चक्कर आल्याचे पोलिसांनी सांगितले.