गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बचाव यंत्रणांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. गुजरातमधील बर्दा डुंगर येथे अशाच एका घटनेत अवघ्या चार दिवसांपूर्वी मुलाला जन्म देणाऱ्या मातेला पोलिसांनी सुरक्षित स्थळी पाठवलं आहे. एक महिला पोलीस कर्मचारी नवजात बाळाला हातात घेऊन जाताना दिसली. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
गुजरातचे वन आणि पर्यावरण मंत्री मुलू अय्यर बेरा यांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस नवजात बाळाला आपल्या कुशीत घेऊन जाताना दिसत आहे. तर बाळाची आई आणि इतर अनेक महिला त्यांच्यासोबत सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतात. भंवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेरा यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये "सेवेद्वारे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भंवड प्रशासन सतर्क आहे. तुम्ही GujaratPolice सोबत असाल, तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित हातात आहात" असं म्हटलं आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. वादळामुळे अनेक विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळ बिपरजॉयची लँडफॉल प्रक्रिया सुरू झाली आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे 125 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गुजरातच्या ज्या भागात हे चक्रीवादळ सागरी किनार्यावर धडकत आहे, तिथे एक वृद्ध जोडपं राहतं ज्यांनी चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे.
एकदा दोनदा नव्हे तर 'या' वृद्ध जोडप्याने चक्रीवादळात तीनदा गमावलं घर; बिपरजॉयवर म्हणतात...
गुजरातमधील जाखाऊ येथील एका जोडप्याने अनेक वेळा त्यांचं घर पुन्हा बांधलं आहे. हवाबाई आणि उस्मान, दोघेही 70 वर्षांचे आहेत. ते सध्या जखाऊ जवळील निवारागृहात आहेत ज्यांना किनार्याजवळच्या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. उस्मान म्हणाले, "आमच्याकडे पक्कं घर नसल्यामुळे, आम्ही यापूर्वी चक्रीवादळात आमचं घर कोसळताना आणि उडताना पाहिलं आहे." या दाम्पत्याचा उदरनिर्वाह शेतीतून होतो. त्यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी त्यांच्या कमाईने आणि मुलांच्या मदतीने त्यांनी घर पुन्हा बांधलं.