चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. मिचाँग य़ा चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामानाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात आणि रहिवासी परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ निर्माण झाल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.
चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सतत पाऊस पडत असून, वीजपुरवठा खंडित होऊन पाणी साचले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या कार पाण्यात वाहून गेल्याचं दिसत आहे. 40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार पाण्यात तरंगत येते आणि त्यानंतर आणखी देखील कार दिसत आहेत. या सर्व गाड्या वाहून गेल्या.
व्हिडीओ पाहिल्यानंतर महागड्या गाड्या एखाद्या खेळण्यांसारख्या पाण्यात तरंगत असल्यासारखं वाटतं. शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे वालजाह रोड, माउंट रोड, अन्ना सलाई, चेपॉक, ओमानदुरार सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आसपास आणि अनेक सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या लोकप्रिय मरीना बीचला पूर आला असून माउंट रोड ते मरीना बीचपर्यंतचे रस्ते पाणी साचल्यामुळे ठप्प झाले आहेत.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने मंगळवारी चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास चक्रीवादळ 'मिचाँग' चेन्नईच्या पूर्व-ईशान्येस सुमारे 90 किमी अंतरावर तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले. सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यानंतर चार जिल्ह्यांतील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळं, बँका, वित्तीय संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.