पश्चिम बंगालच्या बाकुंडा जिल्ह्यात एका युवकाने संतप्त होऊन प्रशासनाचा हटके निषेध नोंदवला. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या कारसमोर हा ४० वर्षीय तरुण कुत्र्यासारखे भोकताना दिसून आला. सध्या सोशल मीडियावर ह्या निषेध नोंदवण्याच्या प्रकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. बाकुंडा जिल्ह्यातील बाकुंडा २ विभागातील बाकना ग्रामपंचातमधील केशियाकोले या गावातील हा युवक आहे. श्रीकांत दत्ता असे याचे नाव असून त्याने कुत्र्यासारखे भुंकत निषेध नोंदवला.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत दत्ता यांस अन्न आणि पुरवठा विभागातून आरकेएसवाय रेशनकार्ड मिळाले होते. मात्र, या रेशनकार्डवर त्यांचे उपनाव हे दत्ता ऐवजी कुत्ता असे झाले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे श्रीकांत दत्ता हे संतप्त झाले असून त्यांना लोकांसमोर खजील झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे, त्यांनी घडलेला प्रकार प्रशानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर लक्षात यावा, ह्यासाठी कुत्र्यासाऱखे भुंकत निषेध नोंदवला.
बुधवारी सहायक बीडीओ बिकाना ग्रामपंचायतीच्या दुआरे सरकारने आयोजित केलेल्या शिबीराचा दौरा करण्यासाठी आले होते. त्याचवेळी, श्रीकांत दत्ता यांनी त्यांच्या गाडीसमोर जाऊन रोष व्यक्त केला. यावेळी, कुत्र्यासारखे भुंकत आपला निषेध नोंदवला. दत्ता यांचं हे प्रकरण ऐकून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनाही खजील झाल्यासारखे वाटले. सरकारी अधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या पिळवणुकीला आणि दुर्लक्षितपणाला कंटाळून श्रीकांत यांनी असा निषेध नोंदवला.