डेहरादून - संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी सोमवारी एका कार्यक्रमात शहीद जवानाच्या आईचे पाय धरून दर्शन घेतले. डेहरादून येथील एका लष्करी कार्यक्रमात स्टेजवर आल्यानंतर शहीद मातेच्या पाया पडून निर्मला सितारमण यांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. यावेळी, व्यासपीठावरील सर्वच मंडळींनी टाळ्या वाजवून सितारमण यांच्या या कृतीचे स्वागत केले.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ डेहरादूनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संरक्षमंत्री निर्मला सितारमण या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तर, या कार्यक्रमात शहीद जवान अजित प्रधान यांच्या मातोश्री हेमा कुमारी यांनीही हजेरी लावली होती. राजधानी उत्तराखंड येथून हेमा कुमारी खास या कार्यक्रमासाठी डेहरादूनला आल्या होत्या. त्यावेळी व्यासपीठावर स्वागत स्विकारताना निर्मला सितारण यांनी हेमा कुमारी यांना पुष्पगुच्छ दिला. त्यानंतर, चक्क त्यांचे पाय धरले. सितारमण यांच्या या कृत्यामुळे व्यासपीठावरील सर्वचजण अवाक झाले, तर खुद्द हेमा कुमारी यांनीही क्षणभरासाठी काहीच लक्षात आले नाही. त्यानंतर, व्यासपीठावरील नेत्यांनी टाळ्या वाजवून निर्मला सितारमण यांच्या कृत्याचे स्वागत केले.
मसूरीचे भाजपा आमदार गणेश जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन निर्मला सितारमण यांच्या या कृत्याचे कौतुक केले आहे. डेहरादून येथील माजी सैनिकांच्या कार्यक्रमात निर्मला सितारमण यांनी सहभाग नोंदवला. त्यावेळी, उत्तराखंडचे शहीद सेना पदक विजेता अजित प्रधान यांच्या मातोश्री सितारमण यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर आल्या होत्या. त्यावेळी, निर्मला यांनी हेमा कुमारी यांचे पाय धरून आशीर्वाद घेतला. सितारमण यांच्या या कृत्याने आम्हा सर्वच माजी सैनिकांची मान अभिमानाने ताठ झाल्याचे गणेश जोशी यांनी ट्विटरवर लिहिले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर निर्मला सितारमण यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच बिहारमध्ये शहीद जवान पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव आणण्यासाठी एकही राजकीय नेता विमानतळावर हजर राहिला नाही. त्यावरुन नितिश कुमार यांच्यासह भाजप मंत्र्यांनाही नेटीझन्सने ट्रोल केले होते. त्यामुळे निर्मला सितारमण यांचे हे कृत्य महान असल्याचं सांगत भाजपाकडून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.