ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आपचे आमदार कपिल मिश्रा यांना बुधवारी भर दिल्ली विधानसभेत मारहाण करण्यात आली. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच आपचे आमदार कपिल मिश्रा यांच्यावर तुटून पडले. वृत्तवाहिनीवरील दृश्यांमध्ये काही आमदारांनी कपिला मिश्रा यांचा गळा पकडला होता तर, काही त्यांना लाथ मारत असल्याचे दिसत होते.
प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच विधानसभेतील मार्शल्सकरवी कपिल मिश्रा यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर आरोप केल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात आघाडी उघडली होती. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी ते उपोषणालाही बसले होते.
सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले आणि हे मी स्वतः पाहिलं असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता. केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
उपोषणाला बसलेले असताना आप समर्थकाने केला होता हल्ला
उपोषणाला बसलेल्या कपिल मिश्रा यांच्यावर आप समर्थकाने हल्लाही केला होता. "एक हल्लेखोर आरडाओरड करत माझ्याकडे आला. त्याचा हेतू चांगला दिसत नव्हता. तुला सोडणार नाही, असे म्हणत त्याने माझ्यावर हल्ला केला." तर कपिल मिश्रा यांनी पक्षविरोधी काम केले आहे. मी स्वत:च येथे आलो आहे. मला कुणीही पाठवलेले नाही, असे या हल्लेखोराने म्हटल्याचे कपिल मिश्रांनी सांगितले होते.
केजरीवालांच्या पत्नीने कपिल मिश्रांना दिले होते उत्तर
"मला दीदी म्हणायचे...घरात 2 कोटी आले तर किमान सांगायचं तरी...बरं 5 तारखेला केव्हा आला होतात ते तरी सांगा... तुमच्यासाठी चहा तरी केला असता" असं ट्विट करून त्यांनी कपिल मिश्रांच्या आरोपांचं एकप्रकारे खंडनच केलं आहे.