ऑनलाइन लोकमत
माऊंट अबू, दि. 23 - सेल्फीच्या नादात लोकांनी जीव गमावल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र तरीही धोकादायक ठिकाणी किंवा परिस्थितीत सेल्फी काढण्याची हौस काही कमी होताना दिसत नाही. अशाच प्रकारे अजगरासोबत सेल्फी काढणं एकाला महागात पडलं. सेल्फी काढत असताना अजगराने त्याचा चावा घेतला. राजस्थानमधील माऊंट अबूमध्ये ही घटना घडली आहे.
माऊंट अबूमधील एका हॉटेलमध्ये अजगर घुसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनअधिकारी आणि स्थानिकांनी या अजगराला पकडलं. त्याची सुटका करण्यासाठी नेण्यात येत असताना एक तरुण समोर चालता चालता सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. किमान 10 ते 15 फूट लांबीचा हा अजगर वनअधिकारी आणि स्थानिकांनी हातात पकडला होता. मात्र त्याचं तोंड मोकळं होतं. हा तरुण सेल्फी काढण्यासाठी जवळ आला असता अजगराने अचानक त्याचा चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्याने तरुणदेखील घाबरला आणि सेल्फी काढायचं विसरुन तिथून बाजूला निघून गेला.
#WATCH Mount Abu (Rajasthan): Selfie with a python? Think again... pic.twitter.com/rHxLbL1SwH— ANI (@ANI_news) September 23, 2016