देशात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यमुनेपाठोपाठ आता हिंडन नदीलाही उधाण आले आहे. त्यामुळे गाझियाबाद, नोएडासारख्या दिल्लीच्या आसपासच्या भागातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, ग्रेटर नोएडा येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रिकाम्या जागी पार्क केलेली शेकडो वाहनं पाण्यात बुडाली आहेत. आता सखल भाग रिकामा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ ग्रेटर नोएडातील सुतियाना गावातील आहे. इकोटेक 3 स्टेशनच्या परिसरात हिंडन नदीचे पाणी आले, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यात 300 हून अधिक वाहनं बुडाली, त्यांच्या आतही पाणी शिरलं. ही पार्क केलेली वाहनं कॅब सेवेतील आहेत. ही वाहनं जवळपास पाच फूट पाण्यात बुडाली आहेत. जिथे पाणी भरले ते ओला कंपनीच्या गाडीचे डंप यार्ड आहे. कोरोनाच्या वेळी जप्त केलेली किंवा खराब झालेली वाहने येथे ठेवली जातात.
सतपाल नावाच्या व्यक्तीच्या जमिनीवर हे डंप यार्ड बांधले आहे. डंप यार्डच्या आजूबाजूला भिंत आहे, ज्याचा केअर टेकर दिनेश यादव आहे. दिनेश यादव यांनी सांगितले की, कोरोनाच्या वेळी ही जुनी आणि जप्त केलेली वाहने आहेत. ही वाहने सध्या बंद पडून डंप यार्डमध्ये उभी आहेत. नोएडातील सखल भागातील घरांमध्येही पाणी शिरले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) सुरेश राव कुलकर्णी यांनी सांगितले की, इकोटेकसह छिजारसीच्या सखल भागात पाणी आहे. येथून बाहेर काढलेल्या लोकांना जवळच्या शाळांमध्ये ठेवले आहे. त्यांच्यासाठी येथे शक्य ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
हिंडनच्या पाण्याच्या पातळीबरोबरच नोएडातील पावसानेही संकटात भर घातली आहे. सुमारे एक तास पाऊस पडल्यानंतर ग्रेटर नोएडाच्या सेक्टर ओमीक्रॉन-1 च्या एचआयजी अपार्टमेंटची दुरवस्था झाली होती. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे पाणी येथील युजीआरमध्ये भरले आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की, हे घाण पाणी यूजीआरच्या आत जात आहे आणि तेच पाणी लोकांच्या घरातील टाक्यांना पुरवले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.