आई वडिल हे आपल्या मुलाचे पहिले गुरु असतात. मात्र, शाळेची पायरी चढल्यानंतर शिक्षक हेच मुलांचे आणि त्यांचे भविष्य घडवणारे त्यांचे गुरुवर्य असतात. म्हणूनच, आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकांनाही मानाचे आणि आदराचे स्थान प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये असते. त्यामुळे, शाळेतून बाहेर पडल्यानंतर किंवा कॉलेजमधून नोकरी-व्यवसायात पुढे गेल्यानंतरही मागे वळून पाहताना शाळेच्या आठवणी सर्वात संस्मरणीय क्षण असतात. शिष्य, विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी गुरुजनांपुढे तो विद्यार्थीच असतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल जिल्हाधिकाऱ्यांच्या एका व्हिडिओतून शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यातील प्रेमळ जिव्हाळा दिसून येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत सेवानिवृत्त झालेल्या आपल्या शिक्षकेच्या घरी कलेक्टर हे त्यांच्या शालेय मित्रांसमवेत पोहचतात. त्यावेळी, कलेक्टर बनलेल्या विद्यार्थ्याला, मोठ-मोठ्या पदावर काम करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकेच्या डोळ्यात पाणी येते. आपल्या शिक्षकी सेवेचं सार्थक झाल्याची भावनाच त्यांच्याकडून व्यक्त होते. यावेळी, संबंधित ज्येष्ठ शिक्षिकेच्या घरीही आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
दरम्यान, कलेक्टर असेलला हा विद्यार्थी आपल्या शिक्षिकेकडे पुन्हा एकदा शाळेतील छडी मारण्याची जिद्द करतो. आपल्यासह इतरही मित्रांना मॅडमकडून छडी मारुन घेण्याचं सूचवतो. अतिशय भावनिक, व तितकाच हा प्रेमळ क्षण व्हिडिओत कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, शिक्षिका कलेक्टरला छडी मारताना दिसून येतात, त्यानंतर कलेक्टर विद्यार्थी शिक्षिकेच्या पाया पडतो. ट्विटरवर मानसी द्विवेदी यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपली शाळा आठवतेय. दरम्यान, कलेक्टरांनी परिधान केलेली लुंगी पाहता हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचे लक्षात येईल.